या हाताने स्तन गोंदून घे
लाव मंदिरी दिवा
फूल होऊनी अंधाराचे
गळून पडे काजवा
तू मरणावर मग रेखावे
प्राक्तनगंधी मोती
की डोहावर किणकिणते गे
शतजन्मांची भीती
असुनी तुझा मी तुझी दूरता
तुला झाकितो काल
संग उर्मिले कुणी बांधले
नयनी चंद्रमहाल
रंग उगा की उभा उदासिन
महामेघ क्षितिजात
पायाखाली वाळवंट मग
उगवत ये निमिषात
लाव मंदिरी दिवा..
लाव मंदिरी दिवा परंतु
सोड स्तनांची माया
मरणावाचून आज सजविली
मीच आपुली काया!
- ग्रेस
Tuesday, September 7, 2010
Subscribe to:
Posts (Atom)