Saturday, November 22, 2008

पक्ष्यांचे लक्ष थवे -- ना.धों. महानोर

दिवा जळे दिवठणी
रोज काळीजकहाणी
भिंतीआड कळोखाच्या
डोळा ओथंबले पाणी
मिटे पंखात काळोख
घोर जिवाला लागणी
माय, वैराण वा-याने
मन झाले धूळधाणी.
------------------
निघताना वेशीपाशी
डोळे भिजले ग माय
इथे गुंतल्या मायेची
ओटी भरलेली सय

वाटा गेल्या दूरदेशी
तरी मन घोटाळावे
कधी तुडुंब दु:खात
डोळे माहेराला यावे
------------------

Thursday, November 20, 2008

संध्यापर्वातील वैष्णवी -- ग्रेस

पाठशिवणिचा खेळ
पोटशिवणिच्यासाठी;
थोडे रडु येता येता
म्रुत्यू हसु लागे ओठी

आता तक्रारच नाही
तुम्ही शांतपणे जगा
पण देठ तोडताना
ठेवा फुलासाठी जागा
-------------------
अरण्ये कुणाची जिवाच्या तळाशी
गळे फूल आणि उडे धूळ का?
जणू तारकांच्या प्रवाहातुनी ये
कुण्या यादवांची जुनी द्वारका

दिशांच्या उमाळ्यात कोणी निघाले
निळ्या सरणीच्या पहाडावरी
जशा स्वप्नभोगातल्या मिठीला
कधी लागती अम्रुताच्या सरी

मी व्याकुळाने तुझे हात तोडून
या पोकळीला दिली साधना
घुमे राउळांच्या तळाचा पुकारा
न हातात माझ्या अता प्रार्थना
---------------------------
संध्याकाळी सूर्यसकाळी
मरतच नाही हळवे
तेच जिवाला फुंकर देती
शकुनफुलांचे दिवे.
पापामध्ये विझले नाही
पुण्यामध्ये सडले नाही
खरेच त्यांना काय हवे?
गंगेवरती स्पंद नवे?
तारक मारक वारा असुदे
लहरींवरती जगती ते
उलटुनी येता अत्तर काळे
शुभ्रपणाने जळती ते!
------------------